विवाहसोहळ्यात विषबाधा; ६०० जणांची प्रकृती बिघडली   

चिमुकल्याचा मृत्यू 

छत्रपती संभाजीनगर : विवाह सोहळ्यात जेवणातून विषबाधा होऊन जवळपास ६०० वर्‍हाडींची प्रकृती बिघडली. तर एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. १७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाला येथे ही घटना घडली.
 
कन्नड तालुक्यातील अंबाला-ठाकूरवाडीमध्ये सामूहिक विवाहसोहळा पार पडला. ठाकर समाजातील आठ जोडपी येथे विवाहबद्ध झाली. अंबाला येथील ग्रामस्थांसह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह, ठाकुरवाडी, कन्नड तालुक्यासह निरगुडी पिंपरी तसेच नाशिक, जळगावमधील ३२ ठाकरवाड्यातील पाहुण्यांनी या विवाहाला हजेरी लावत भोजनाचा आस्वाद घेतला होता. वर्‍हाड्यांना अचानक उलटी, जुलाब, पोटदुखी असे त्रास होऊ लागले. यामुळे त्यांना परिसरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
 
विविध गावातील जवळपास ६०० जणांना विषबाधा झाली. करंजखेड येथील आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान सुरेश गुलाब मधे या ८ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतरांवर करंजखेडासह इतर आरोग्य केंद्र आणि स्थानिक रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामधील भागाबाई बुंधा मेंगाळ, गंगुबाई बुंधा मधे, रखमाबाई लक्ष्मण मथे, वनिता तुकाराम मेंगाळ, काळूबाई मनोज मेंगाळ, आदित्य तुकाराम मेंगाळ, गायत्री गुलाब मधे, संदीप मधे यांच्यासह १७ जणांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. करंजखेड आणि नागापूर येथील आरोग्य केंद्रात आणि खासगी रुग्णालयात १५५ रुग्णांना उपचारासाठी शनिवारी दाखल करण्यात आले आहे.
 

Related Articles